एअरटेलची दोन लाखांची फायबर केबल चोरी; अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : रस्त्याच्या कामामुळे भवन, पिंपरीफाटा, चिंचखेडाफाटा, भराडी व वडोदचाथा परिसरात रस्त्याच्या कडेला ठेवलेली एअरटेल कंपनीची सुमारे दोन लाख रुपये किमतीची ८०० मीटर ऑप्टिकल फायबर केबल व सहा जॉइंट क्लोजर दोघांनी चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

चोरी करताना कंपनीच्या अभियंत्याने त्यांना हटकले असता, चोरट्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी सकाळी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश एकनाथ करोडदे (वय ३३, एअरटेल कंपनीचे ऑप्टिकल फायबर अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ज्ञानेश्वर मोकासे व अर्जुन कुडाळ (दोघे रा. सिल्लोड) यांनी संगनमताने विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला पांगवलेली केबल चोरून नेली. केबल जमा करताना अभियंता करोडदे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी दोघांना हटकले असता, त्यांना चकवा देत दोघांनी तेथून पळ काढला. 

तसेच, याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे, संशयितांनी दोन वर्षांपूर्वी एअरटेल कंपनीत देखभालीचे काम केले होते. त्यामुळे कोणत्या ठिकाणी केबल उघड्यावर ठेवली आहे, याची त्यांना माहिती होती. याच माहितीचा फायदा घेत त्यांनी केबल चोरल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. केबल चोरीचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाला आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध चोरी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.